खंडोबाची सकाम उपासना सर्वत्र रूढ आहे. अनेक भाविक लोक ह्या दैवतास नवस बोलतात. नवस फेडण्याचे अनेक प्रकार आहेत. नवस फेडण्याचे अनेक प्रकार आहेत. नवस फेडतांना काही आत्मक्लेष सहन केले पाहिजेत असा संकेत काल-परवा पर्यंत रूढ होता. वारंवार खंडोबाची यात्रा करणे (खेटे घालणे) देवाला पाण्याच्या कावडी घालणे यात फारसे क्लेष नसले तरी मानेस किंवा टोचून घेऊन देवापुढे स्वत:स टांगून घेणे अ तशा स्थितीतच देवाला प्रदक्षिणा घालणे (बगाड लावणे) हा आत्मक्लेष एक प्रकारचा अतिरेक दिसून येतो. ही पद्धत आज रूढ नसावी. अग्नीवरून चालत जाणे हा त्यातलाच प्रकार. मांडीत किंवा पायाच्या पोटरीत मोगरी किंवा तलवार आर-पार घालून निघालेल्या रक्ताचा टीळा लावणेही प्रथा खंडोबाच्या वीर ह्या भक्तामध्ये होती. साखळदंड तोडणे हे प्रकार पूर्वी चालत.
आज देवावर चवरी ढाळणे, जागर करणे, ब्राह्मण, धनगर जोडपे, गुरव, वाघ्या-मुरळी ह्यांना भोजन घालणे, मौल्यवान वस्तूंचे दान करणे, तळी भरून भंडारा उधळणे हे नवस फेडण्याचे प्रकार देवालयात अवलंबिले जातात.खंडोबाला बेल आणि दवणा प्रिय आहे. त्यास भरीत आणि रोड्ग्याचानैवेद्य दाखवतात. कच्च्या पातीचा कांदा त्याला अतिशय प्रिय असल्याचे मानले जाते.
खंडोबाच्या उपासनाविधीत मंदिरात पायरया बांधणे, तळी उचलणे, आणि जागरण घालणे या सारखे विधी प्रचलित आहेत. त्याच्या पुजा विधीत भंडारयाला विशेष महत्व असते. खंडोबाच्या नावाने भंडारा (हळदीची पूड)लावणे, भंडारा उधळणे याला महत्व असते. खंडोबाच्या उपासनाविधीत भंडारा, कोटंबा, दीपमाळ यांना लोकजीवनात श्रद्धेच स्थान आहे. त्यात देवत्व असल्याची श्रद्धा लोकमानसात रुजलेली दिसे.
खंडोबाच्या उपासनेत वाहन्यालाही विशेष महत्व आहे. खंडोबाला घोडा वाहणे,पादुका वाहणे, डोळे वाहणे, प्राणी (बोकड,कोंबडा) वाहणे, मुलगा वाहणे(वाघ्या), मुलगी वाहणे(मुरळी) इ.