खंडोबाचे जागरण (गोंधळ)

ज्या घराण्याचे कुलदैवत खंडोबा आहे. अशा घराण्यात लग्न, मौंज प्रसंगी किंवा खंडोबाच्या उपासनेतील एक विधी म्हणुन नवस फेडण्याच्या निमित्ताने जागरण घालण्याची प्रथा महाराष्ट्रात प्रचलित आहे. जागरण केल्याशिवाय खंडोबाच्या उपासनाविधीत पुर्णत्व येत नाही, अशी श्रद्धा लोकमानसात आढळते. देवातील शक्तीला जाग आणण्यासाठी, त्या शक्तीची कृपा संपादन करण्यास व त्यातून जीवन सुखी होण्याचाही उद्देश जागरणामागे असतोच. त्यामुळे धर्मविधी आचरणात ठेवण्यासाठीही उपयुक्त ठरतात. जागरणात खंडोबाचा पूजा विधी, गण, देव-देवतांचे आवाहन, खंडोबाची महात्म्यपर गाणी आणि उलट रंगात खंडोबाची संसार कथा आणि आरती असे स्वरूप जागरणाचे असते.

जागरण करतांना वाघ्या-मुरळी त्यांच्या गीतातून खंडोबाच्या संसाराची कहाणी, खंडोबाचे रूप-गुण वर्णन, त्याच्यातील प्रणयी भाव आणि वृत्ती, बनाईविषयी त्याला असलेली प्रीती, म्हाळसा-बाणाई याच्यातील कलह, दोन बायकांचा दादला म्हणुन खंडोबाची स्थिती, खंडोबाचा लग्न सोहळा, त्याचा थाट-माट, त्याचा पराक्रम, जेजुरी वर्णन असे विषय वर्णन करतात. हे वर्णन लौकिक जीवनाच्या पातळीवरून असल्याने वाघ्या-मुरळीच्या या गीतांना एक वेगळे पण आलेले आहे. वाघ्या-मुरळीकडून जागरण-गोंधळ होत असतांना खंडेराया, म्हाळसा, बाणाई या आपल्यापैकीच आहेत असा आपण भाव त्यातुन निर्माण होतो. दोन बायकांच्या दादल्याची फजिती, सवती-सावतीतील कलह आणि स्री-पुरुषातील प्रणयभाव यांचे हुबेहूब चित्रण वाघ्या-मुरळी या गीतातून व्यक्त करतात.