चंदनपुरीचा खंडेराव

मराठी लोकधर्मात आणि लोकजीवनात खंडोबा या लोक देवतेला आगळे-वेगळे स्थान आहे. लोक माणसात खंडोबाविषयी श्रद्धायुक्त आपले पणाचा भाव आज हि बऱ्याच प्रमाणात पहावयास मिळतो.खंडोबाची लोकमानसात तयार झालेली प्रतिमा व लौकिकरन आणि क्षेत्रपाळ म्हणून भूमिका आहे. मल्हारी महात्माच्या आधारे खंडोबाची उपासना महाराष्ट्रात बाराव्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे दिसते.
खंडोबा हा लोकदेव मल्हारी, मल्हारी-मार्तंड, मल्लारी, भैरव, म्हाळसाकांत आणि खंडेराय या नावाने ही ओळखला जातो. मल्हारी मार्तंड भैरव हे त्याचे संस्कृत नाव आहे.

मराठी माणसांकडून अनेक ग्रामदेवतांचे मनोभावे पूजन केले जाते या ग्रामदेवतांमध्ये खंडोबाचे स्थान अनन्यसाधारण महत्वाचे मानले जाते. बहुतेक घरांमध्ये खंडोबा हे कुलदैवत असून खंडोबाची नियमित पूजा करण्याची प्रथा पाळली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या मराठी जनतेसोबत कर्नाटकातही खंडोबा हे दैवत मोठया प्रमाणात पूजले जाते. कर्नाटकात खंडोबाला मैलार नावाने ओळखले जाते. खंडोबाचे महाराष्ट्रातील मुख्य स्थान जेजुरी हे मानले जाते तर चंदनपुरीला द्वितीय स्थानाचे महत्व प्राप्त झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील खानदेश या भागातील ब्राह्मण, धनगर, भोई, लोहार, सुतार, कोळी, गवंडी, माळी, तेली, वाणी, मराठा अशा अनेक जातीमध्ये खंडोबा हे कुलदैवत आहे.

या महत्वपूर्ण दैवताची महाराष्ट्रात सात तर कर्नाटकात पाच प्रमुख स्थाने मानली जातात. त्यापैकी चंदनपुरी अर्थात खंडोबाच्या द्वितीय पत्नीचे माहेर फारसे अभ्यासले गेलेले दिसत नाही.